‘ अंतिम संस्कार वडिलांनी करू नयेत ‘ , आई अन मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना अमरावती जिल्ह्यात समोर आलेली असून अभियंता असलेली एक मुलगी आणि तिची आई यांचे मृतदेह घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आलेले आहेत. अमरावती शहरातील एशियाड कॉलनी परिसरात संमती शिक्षक कॉलनी येथे हा प्रकार उघडकीला आला असून प्रथम दर्शनी ही घटना म्हणजे आत्महत्या असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मृणाल प्रदीप वानखडे ( वय पंचवीस ) आणि सुवर्ण वानखेडे ( वय 51 वर्ष ) अशी मयत व्यक्तींची नावे असून महिलेच्या पतीला अटक करण्यात आलेली आहे. सदर व्यक्तीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून घटनास्थळी मिळालेल्या सुसाईड नोटवरून घरगुती वादातून हा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘ सर्व जगाने आम्हाला प्रेम दिलं मात्र वडिलांना ते नको होतं ‘ असा मजकूर चिठ्ठीत लिहिलेला असून आमचे अंतिम संस्कार वडिलांनी करू नयेत असे देखील म्हटले आहे. पोलिसांनी कारवाई करत महिलेच्या पतीला अटक केली असून ही चिठ्ठी कोणी लिहिली याचा देखील पोलीस सध्या शोध घेत आहेत. गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीला आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


शेअर करा