
नगर शहरात लाचखोरीचे एक प्रकरण समोर आले असून सर्जेपुरा येथील महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयातील जिल्हा परिविक्षा अधिकारी महेश आनंदराव पाटील यांना तीन हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 27 ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून तोफखाना पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, नगर तालुक्यातील बायजाबाई जेऊर येथील एका तक्रारदाराच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झालेला होता. सदर प्रकरणी तक्रारदार विरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल आहेत का या संदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिविक्षा अधिकारी यांना देण्यात आले होते त्यावेळी न्यायालयाकडे इतर गुन्हे आरोपीच्या विरोधात दाखल नाहीत असे म्हणणे देण्याकरता तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क केलेला होता.
तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला आणि त्यानंतर महेश पाटील यांना रंगेहात लाच घेताना पकडण्यात आले. आपली कामे करून देण्यासाठी कोणी लाच मागत असेल तर 10 64 या टोल फ्री नंबर वर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन विभागाकडून करण्यात आले असून तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवण्यात येईल असे देखील सांगण्यात आलेले आहे.