स्वतःची ‘ वेगळीच ‘ शक्ती आजमावी म्हणून साप पकडला अन ..

भारतात अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे लोक राहत असून कधी कोण काय कुठल्या पद्धतीने चर्चेत येईल याचा काही नेम राहिलेला नाही. झारखंडच्या पश्चिम सिंहभूम इथे एक घटना चर्चेत आलेली असून चक्रधरपुर येथील एका गावात एका व्यक्तीने विषारी साप पकडला आणि त्यानंतर त्याचे मुंडके कापले. काही वेळ कापलेल्या सापाचे मुंडके उन्हात वाळवले आणि त्यानंतर घरात आणून चक्क ते शिजवून खाल्ले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना चक्रधरपुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपलब्ध माहितीनुसार, दासर बोदरा असे या व्यक्तीचे नाव असून दाखल केल्यानंतर बराच काळ तो बेशुद्ध अवस्थेत होता मात्र अखेर त्याला शुद्ध आली.आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून शुद्धीवर आल्यानंतर त्याने आपण काय चमत्कार केलेला आहे हे सर्वांपुढे कथन केले त्यावेळी डॉक्टरसह नातेवाईक देखील चकित झाले.

डॉक्‍टरांनी सध्या त्याला अधिकाधिक पाणी पिण्याचा तसेच मीठ खाण्याचा सल्ला दिलेला असून सुमारे पंधरा बाटल्या पाणी अवघ्या काही तासात त्यास पाजण्यात आलेल्या आहेत . दासर हा जादूटोणा करून ज्यांना सर्पदंश झालेला आहे त्यांच्यावर उपचार करण्याचा दावा करतो. आपल्यामध्ये किती शक्ती आहे हे आजमावून पाहण्यासाठी त्याने एक विषारी साप पकडल्यानंतर त्याचे मुंडके कापून शिजवून खाल्ले होते. काहीतरी नवीन प्रकार करावा म्हणून त्याने हा अघोरी प्रकार केला मात्र कुटुंबीयांनी याचा इन्कार केला असून पत्नीसोबत वाद झाल्यानंतर त्याने हा प्रकार केला असे म्हटले आहे.