युक्रेनवरून आलेल्या विद्यार्थ्यांना शोधावा लागणार नवीन देश , केंद्राने जबाबदारी झटकली..

शेअर करा

देशात एमबीबीएसचे महागडे शिक्षण घेणे परवडत नाही म्हणून अनेक जण या शिक्षणासाठी रशिया युक्रेन यासह इतर देशात धाव घेतात मात्र रशिया आणि युक्रेन यांच्यात वाद सुरू झाल्यावर या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. रशिया युक्रेन वादात अनेक विद्यार्थी अडकून पडलेले होते त्यानंतर त्यांना भारतात आणण्यात आले आणि ही आपली जबाबदारीच आहे हे विसरून त्याचाही मोठा डांगोरा पिटण्यात आला. घराच्या ओढीने आलेल्या विद्यार्थ्यांना विमानतळावरच मोदींच्या नावाने घोषणा देखील देण्याच्या देण्यास भाग पाडण्यात आले होते . आपल्या देशात आल्यानंतर या पुढील शिक्षण आपले इथेच पूर्ण होईल अशी या विद्यार्थ्यांना आशा होती मात्र केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्याकडून या विद्यार्थ्यांची निराशा होईल असे वक्तव्य करण्यात आलेले आहे.

डॉक्टर भारती पवार यांनी त्यांना , ‘ भारतातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही मात्र केंद्र सरकार त्यासाठी विद्यार्थ्यांची मदत करणार आहे ‘ असे म्हटले आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात युद्ध सुरू झाल्यानंतर 18 हजार विद्यार्थी भारतात परतले होते त्यातील बहुतांश सर्व विद्यार्थी हे एमबीबीएस वैद्यकीय शिक्षण घेणारे होते. त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने राज्यातील विद्यार्थ्यांना तीन महिन्याचा एक प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून दिलेला होता मात्र त्यांच्या पुढील शिक्षणाची सुविधा देशात उपलब्ध होऊ शकलेली नाही.

युक्रेनमधून परतल्यानंतर भारतातील महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून या विद्यार्थ्यांनी अनेक प्रयत्न केले मात्र चालू शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर निर्णय स्पष्ट करण्यात आलेला असून आता या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा वैद्यकीय प्रवेशासाठी दुसरा देश शोधण्याची वेळ आलेली आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशात अद्यापही युद्ध सुरू असून युद्धग्रस्त क्षेत्रात पाठवण्यास पालकही फारसे इच्छुक नाहीत त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा दुसरा देश शोधावा लागणार आहे. सरकारने काही तरी पावले उचलून आम्हाला भारतातच शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे देखील या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.


शेअर करा