मला दिली तशी कोरोना लस माझ्या ‘ मोती ‘ ला द्या , आरोग्य केंद्रात घातला गोंधळ

माणसाचा सर्वाधिक जवळचा मित्र असलेला पशु म्हणून कुत्र्याची ओळख आहे. माणूस आणि कुत्रा यांच्यातील नाते हे अनेक काळापासून मित्रत्वाचे राहिलेले आहे. आपल्या आवडत्या कुत्र्याचा मृत्यू झाल्यानंतर अनेक नागरिक नैराश्यात देखील गेलेले आहेत मात्र छत्तीसगड येथील कोरबा येथे एक वेगळेच प्रकरण समोर आले असून आपल्या कुत्र्याला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून एका व्यक्तीने तीन पाळीव कुत्रे घेऊन लसीकरण सेंटर गाठले आणि तिथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांकडे आपल्या कुत्र्याला लस द्या अशी मागणी केली. कर्मचाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने त्यांना शिवीगाळ आणि मारहाण देखील केली.

उपलब्ध माहितीनुसार, रामायण सिंह मंझवार असे या व्यक्तीचे नाव असून शुक्रवारी हा व्यक्ती त्याने पाळलेल्या टॉमी, शेरू, मोती अशा तीन पाळीव कुत्र्यांना घेऊन आरोग्य केंद्रात गेलेला होता. आपल्या कुत्र्यांना कोरोना होण्याची मला भीती वाटते म्हणून ‘ मला दिलेली आहे तीच लस या कुत्र्याला देखील द्या ‘, अशी देखील मागणी त्याने केली. प्राण्यांना कोरोनाची लस देता येत नाही असे कर्मचाऱ्यांनी सांगितले मात्र तो दारूच्या नशेत असल्याने त्याने त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही.

रामायण सिंह याने आपला आग्रह कायम ठेवला मात्र आरोग्य कर्मचारी ऐकत नसल्याने त्याने त्यांना शिवीगाळ सुरू केली. दारुच्या नशेत असलेला रामायण सिंह याला सरकारी कर्मचारी आपले ऐकत नाहीत हे लक्षात आल्यावर त्याचा राग अनावर झाला आणि त्याने त्यांना धक्काबुक्की देखील सुरू केली. लसीकरणासाठी सहभागी झालेले आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र एक करून काम करत आहेत मात्र त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारकडून कुठलीही पावले उचलली जात नाहीत त्यामुळे असे अनेक विचित्र अनुभव या कर्मचाऱ्यांना येत आहेत .