धनकवडीतील ‘ त्या ‘ दुर्घटनेनंतर ठेकेदारावर व मालकावर गुन्हा

पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार धनकवडी परिसरात उघडकीस आलेला असून एका बिल्डिंगच्या जलवाहिनीचे काम करताना अकराव्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. 18 तारखेला दुपारी ही घटना घडलेली असून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ठेकेदार आणि घरमालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सुनील भिमराव शिंगाडे ( वय 27 वर्ष राहणार लक्ष्मी नगर डहाणूकर कॉलनी ) असे मयत झालेल्या कामगाराचे नाव असून ठेकेदार असलेला सुधाकर शंकर पवार ( वय 36 वर्ष राहणार डहाणूकर कॉलनी ) आणि घरमालक असलेला हेमंत भोंगळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ परिसरात लेक टाऊन सोसायटी येथे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अकराव्या मजल्यावर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. शिंगाडे यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने जाळी हेल्मेट सेफ्टी बेल्ट असे सर्व साहित्य पुरवणे गरजेचे असताना ठेकेदाराने निष्काळजीपणा केला आणि त्यानंतर शिंगाडे याचा मृत्यू झाला. घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यानंतर रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस उपनिरीक्षक अविनाश डमे पुढील तपास करत आहेत.