पुणे ब्रेकिंग..सात जणांची आत्महत्या नव्हे तर ‘ मास्टरप्लॅन ‘ असा होता की..

नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथून निघून गेल्यानंतर दौंड परिसरातील भीमा नदी पात्रात तब्बल सात जणांचे मृतदेह आढळून आलेले होते. त्यामध्ये वडील मोहन पवार, त्यांची पत्नी , मुलगी जावई आणि मुलीच्या तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला होता. सुरुवातीला हा प्रकार आत्महत्या असल्याची चर्चा होती मात्र पोलीस तपासात अनेक खळबळजनक माहिती समोर आली असून त्यामध्ये या सर्वांची हत्या झाल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

मोहन पवार यांच्या एका मुलाने त्याच्याच नात्यातील एका विवाहित महिलेला पळून नेलेले होते त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला त्या महिलेला तिच्या घरी सोड असे सांगत तू जर तिला घरी सोडली नाही तर आम्ही आत्महत्या करू असे बजावलेले होते . विवाहित महिलेला पळवून नेल्यानंतर मोहन पवार यांचा मुलगा हा त्याचा चुलत भाऊ असलेला धनंजय पवार नावाच्या एका व्यक्तीसोबत सतत संपर्कात होता त्यानंतर लगेचच धनंजय पवार याचा अपघाती मृत्यू झाला त्यामुळे धनंजय पवार याच्या कुटुंबीयाचा आपल्या कुटुंबावर मोहन पवार यांनी करणी केली असा त्यांचा समज झाला आणि त्यातून त्यांनी बदला म्हणून मोहन पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना संपवण्यासाठी प्लॅन केला आणि त्यांना पुणे जिल्ह्यात बोलावून घेतले.

पुणे जिल्ह्यात मोहन पवार हे त्यांची पत्नी मुलगी जावई आणि तीन मुलांसह पोहोचले असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा सर्वांचा गळा आवळून खून करण्यात आला आणि त्यानंतर त्यांचे मृतदेह भीमा नदीच्या पात्रात फेकून देण्यात आले अशी प्राथमिक माहिती हाती आलेली असून पोलिसांनी या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेतलेले आहे. एकापाठोपाठ एक असे तब्बल सात मृतदेह दौंड परिसरात असलेल्या भीमा नदी पात्रात आढळून आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती .

मोहन उत्तम पवार ( वय ४५ ) , संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी यातील चार मृत व्यक्तींची नावे असून इतर तीन मुले अल्पवयीन आहेत. मंगळवारी 17 जानेवारी रोजी निघोज या गावातून सर्वजण निघाले आणि त्यानंतर शिरूर चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात त्यांचे मृतदेह आढळून आले. 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला त्यानंतर 20, 21 आणि 22 जानेवारी रोजी तीन मृतदेह आढळून आल्याने ही आत्महत्या कि घातपात याविषयी देखील चर्चा सुरु होती.