
महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना सातारा येथे समोर आलेली असून जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीवर एकापाठोपाठ एक अशा तब्बल सहा गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत. सुदैवाने गोळ्या त्यांना लागल्या नाही मात्र आरोपी व्यक्तींनी त्यानंतरही त्यांना पकडून त्यांचा गळा चिरून तिथून पलायन केले त्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे. वाढे फाटा येथे सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अमित आप्पासाहेब भोसले ( वय 38 राहणार शुक्रवार पेठ सातारा ) असे मयत व्यक्तीचे नाव असुन सोमवारी रात्री ते त्यांच्या मैत्रिणीसोबत वाढे फाटा येथे जेवणासाठी गेलेले होते. जेवण झाल्यानंतर त्यांची मैत्रीण कारमध्ये जाऊन बसली आणि ते बिल देऊन हात धुण्यासाठी म्हणून बेसिनकडे गेलेले होते त्यावेळी हल्लेखोर तिथे आले आणि त्यांनी त्यांच्यावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या. पळून जाण्याच्या प्रयत्नात ते खाली पडले त्याचवेळी आरोपींनी त्यांना पकडून त्यांचा गळा चिरला.
आरडाओरडा झाल्यानंतर त्यांची मैत्रीण कारमधून बाहेर आली मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झालेले होते. भोसले यांचा खून हा प्रॉपर्टीच्या वादातून झालाय की प्रेम प्रकरणातून याची माहिती सध्या पोलीस घेत असून आतापर्यंत एकाही आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या नाहीत. आरोपी ताब्यात आल्यानंतर खुनाचे कारण समोर येऊ शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे.