‘ दोघे मुस्लिम म्हणूनच निकाह लावला ‘, अखेर ‘ तो ‘ व्यक्ती देखील कॅमेरासमोर

समीर वानखेडे आणि त्यांचे वडील हे मुस्लीमधर्मीय होते. त्यामुळेच त्यांचा आणि शबाना कुरेशी यांचा निकाह लावण्याला परवानगी देण्यात आली. समीर वानखेडे आणि त्यांचे वडील मुस्लीम नसते तर कोणत्याही काझीने त्यांचा निकाह लावूनच दिला नसता, असे समीर वानखेडेंचा निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी सांगितले. मुजम्मिल अहमद यांनीच 2006 साली समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह लावून दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी बुधवारी सकाळी हा निकाहनामाही ट्विटवरवर शेअर केला होता. वानखेडे यांचा हा कारनामा उघड झाल्यावर आता एनसीबी काय भूमिका घेते हे पाहावे लागेल.

मुजम्मिल अहमद म्हणाले , ‘ मुलगा-मुलगी ज्यावेळेस निकाहसाठी येतात. त्यावेळेस त्यांच्याकडून फॉर्म भरुन घेतला जातो. त्यात बघितलं जातं की मुलगा मुसलमान आहे की नाही, त्याचा बाप मुसलमान आहे की नाही आणि हे पाहूनच निकाह केला जातो. माहिती तर त्यानं घ्यायची असते ज्याला आपल्या मुलीचा निकाह करायचा आहे. आम्ही एवढच बघतो की मुलगा-मुलगी मुसलमान आहेत की नाही आणि ते असतील तर ते राजी असतील तर निकाह केला जातो ‘

समीर वानखेडे यांचे आई आणि वडील दोघेही मुस्लीम असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. ते मुस्लीम असल्यामुळे आम्ही खातरजमा न करता नेहमीप्रमाणे निकाह लावून दिल्याचे मुजम्मिल अहमद यांनी म्हटले. यावेळी मुलाच्या आई-वडिलांनी स्वाक्षरी केली होती. या सगळ्याची नोंदही आमच्याकडे असेल, असे त्यांनी सांगितले. निकाहदरम्यान गवाह देखील मुस्लिम हवा असतो. समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याने निकाह झाला होता. समीर वानखेडे यांनी त्यांच्या वडिलांचं नाव दाऊद लिहिलं होतं .

निकाहावेळी समीर यांनी दाऊद असंच वडिलांचं नाव घेतलं होतं. आम्ही मुलाला त्याचं पूर्ण नाव सांगायला सांगतो, तसंच तुमचा निकाह शबाना यांच्यासोबत एवढ्या महरवर करत आहोत, तुम्हाला हे मान्य आहे? तेव्हा मुलगा म्हणते मान्य आहे. त्यानंतर स्वाक्षरी केली जाते. महरच्या समोरही स्वाक्षरी केली जाते. निकाह लावणारा काझीही त्यावर स्वाक्षरी करतो. तिथे उपस्थित असलेले साक्षीदारही आपली स्वाक्षरी करतात. निकाहवेळी समीर वानखेडे यांनी आपल्या वडिलांचं नाव दाऊद असंच सांगितलं होतं. त्यावेळी ते दाऊदच बनले होते. त्यापूर्वी किंवा त्यानंतर त्यांचं नाव काय असेल ते आम्हाला काय माहिती ? , असेही मौलाना पुढे म्हणाले.

नवाब मलिक यांनी बुधवारी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातील छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत त्यांचा निकाह झाला होता. या निकाहनाम्यावर समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख आहे. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करताना ,’ मुस्लिम मुलीशी निकाह करायचा असेल तर दोघांचाही धर्म एकच असायला हवा अन्यथा तो विवाह ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे समीरच्या आईने निकाहनाम्यावर त्याला सही करायला लावली यामध्ये काहीही गैर नाही,’ असे म्हटले आहे.

समीर वानखेडे यांनी डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी 2006 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर 2016 मध्ये त्यांचा परस्पर संमतीने घटस्फोट झाला. 2017 मध्ये समीर वानखेडे यांनी मराठी अभिनेत्री क्रांती दीनानाथ रेडकर हिच्याशी लग्न केले होते. मुजम्मिल अहमद यांनी ‘टीव्ही 9’ च्या प्रतिनिधींसोबत बोलताना हा खुलासा केला आहे .